पोलीसांसमक्ष अनु.जातीच्या वरातीवर उच्च वर्णीयांची दगडफेक

पोलीसांसमक्ष अनु.जातीच्या वरातीवर उच्च वर्णीयांची दगडफेक


Published On :    17 Feb 2020  By :online

शेयर करा:

नवर्‍याला घोड्यावर बसण्यासही केला विरोध, पाच जण जखमी, ११ आरोपींची ओळख पटली



बनासकांठा: देशात जातीव्यवस्थेची पाळेमुळे किती घट्ट रूजली आहेत याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलीसांसमक्ष अनु.जातीच्या वरातीवर उच्च वर्णींयांकडून दगडफेक करण्यात आली असून नवर्‍या मुलाला घोड्यावर बसण्यासही विरोध झाला. या दगडफेकीत पाच जण जखमी झाले आहेत. हा धक्कादायक प्रकार गुजरात राज्यातील बनासकांठा येथील शरीफ्डा गावातील आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.


आकाशकुमार कोइटिया (२२) याचा रविवारी लग्न समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आकाश हा सैन्यदलात कार्यरत आहे. तो बंगलोरवरून प्रशिक्षण घेऊन परतला होता. मेरठमध्ये त्याची पोस्टींग होती. आकाश आपल्या लग्नासाठी सुट्टीवर आला होता. आकाशचे मोठे भाऊ विजय कोईटिया यांनी सांगितले की, यापूर्वी आम्हांला ठाकूर समुदायातील काही लोकांकडून धमकी मिळाली होती. नवरा मुलगा घोड्यावर बसला तर त्याची वरात गावातून काढून देणार नाही. त्यामुळे आम्ही लिखित स्वरूपात पोलीसांकडून सुरक्षा व्यवस्था मागितली.  त्यामुळे ६-७ पोलीस कर्मचारी विवाहस्थळी सुरक्षेला आले होते. वरात गावातून जात असताना ठाकूर समुदायाकडून दगडफेक सुरू झाली. यामध्ये नवरा मुलगा थोडक्यात बचावला. त्याला पोलीसांच्या व्हॅनमध्ये नेण्यात आले. तर या दगडफेकीत दोन महिलांसहित आणखी तीन नातेवाईक जखमी झाले.


या दगडफेकीनंतर पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. कमीतकमी ५०-६० पोलीस या वरातीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. नवरा व नवरी मुलगी हे सुरक्षितपणे पालनपूर तालुक्यातील सुंधा गावात पोहचण्यासाठी सुरक्षा होती. बनासकांठा येथील कार्यकर्ता दलपत भाटीया म्हणाले, पोलीसांच्या सुरक्षेच्या गराड्यात लग्न समारंभ पार पडला. या दगडफेकीत सहभागी असलेल्या ११ लोकांविरोधात बनासकांठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींची ओळख पटली आहे. आरोपींमध्ये सेनजी कोली, शिवाजी कोली, दीपक कोली, तुषार कोली, विनोद कोली, रामजी कोली, दीपक ईश्‍वर कोली, बाई कोली, मंजू कोली, जितू कोली अशी त्यांची नावे आहेत.