दोन अनु.जातीच्या तरुणांना बांधून पट्ट्याने झोडपलं
Published On : 20 Feb 2020 By online
या तरुणांनी ५०० रुपयांची चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर मारहाण करणार्या आणि त्याला साथ देणार्या सगळ्यांना पोलिसांनी अटक केलीय. अटक केलेल्यांमध्ये ७ जणांचा समावेश आहे.
जयपूर । राजस्थानमधल्या नागौर जिल्ह्यातल्या एका घटनेने खळबळ उडालीय. जिल्ह्यातल्या पांचौडी भागात ही घटना घडलीय. दोन अनु.जातीच्या तरूणांना गुरासारखं मारहाण करण्याची ही घटना असून त्याचा व्हिडीओही व्हायरल झालाय.
या तरुणांनी ५०० रुपयांची चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर मारहाण करणार्या आणि त्याला साथ देणार्या सगळ्यांना पोलिसांनी अटक केलीय. अटक केलेल्यांमध्ये ७ जणांचा समावेश आहे.
हे दोन युवक आपल्या मोटरसायकच्या सर्व्हिसिंगसाठी एका ऑटो सर्व्हिस सेंटरवर आले होते. तिथे आल्यानंतर त्यांनी काउंटरवरून ५०० रुपयांची नोट चोरली असा आरोप सेंटरच्या मालकाने केला. त्यानंतर त्या दोन युवकांना दुकानाच्या मागच्या बाजूला नेण्यात आलं आणि पट्ट्याने मारहाण करण्यात आली.
एवढंच नाही तर त्यांच्या गुप्तांगात पेट्रोलही टाकण्यात आल्याचा आरोप होतोय. आपल्याला मारू नका असं सांगत ते युवक विव्हळत होते. मात्र त्यांना सोडण्यात आलं नाही. काही जणांनी त्या युवकांच्या कुटुंबीयांना फोन केला. त्यानंतर त्यांचे काही नातेवाईक घटनास्थळी आले आणि त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी ७ जणांना अटक करण्यात आली.