सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं पद राहणार की जाणार?

सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं पद राहणार की जाणार?


प्रतिनिधि न्यूज मराठी Online







  • प्रतिमा मथळाडॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी








सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ उर्फ डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची खासदारकी धोक्यात आली आहे.


निवडणूक लढवताना जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दाखल केलेला जातीचा दाखला बनावट असल्याचं सांगत जातपडताळणी समितीने तो रद्द केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.


खासदार महास्वामी यांनी अर्ज दाखल करताना बेडा जंगम जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. पण जातीचा दाखलाच रद्द झाल्याने त्यांची खासदारकी जाण्याची शक्यता आहे.


खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सादर केलेला बेडा जंगम जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार सोलापुरातील रिपाइं नेते प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंदकुरे यांनी केली होती. गेल्या आठ महिन्यापासून त्यावर सुनावणी सुरु होती. 15 फेब्रुवारीला सुनावणी पूर्ण झाली.


याप्रकरणी नियुक्त दक्षता समितीने तपास करुन आपला अहवाल सादर केला. त्यानंतर सोमवारी याप्रकरणी निकाल देण्यात आला आहे. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पुराव्यांसाठी दाखल केलेला दाखलाही संशयास्पद असल्याचं समितीने म्हटलं आहे.


तर, दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून त्रयस्थ समितीमार्फत तपास व्हावा, अशी मागणी जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या वकिलाने केली होती. पण जिल्हा जात पडताळणी समितीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पूर्ण झाल्याचं जाहीर केलं.


"बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली नाही"


जातीचा दाखला अवैध ठरवल्याच्या समितीच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार, असं महास्वामी यांचे वकील अॅड. संतोष न्हावकर यांनी सांगितलं आहे. ते पुढे सांगतात, "जातपडताळणी समिती तक्रारदाराच्या दबावाखाली काम करत होती. खासदार महास्वामी यांना पुरेशी संधी देण्यात आली नाही. पुरावा देण्याची संधी न देता गडबडीत निकाल देण्यात आला. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. आमची बाजू भक्कम आहे. तिथं आम्हाला नक्की न्याय मिळेल, याची खात्री आहे



प्रतिमा मथळानिकालाची प्रत


"कॅव्हेट दाखल करणार"


निर्णयाला स्थगिती मिळवण्याचा खासदार महास्वामी यांचा उद्देश आहे. त्यामुळे कॅव्हेट दाखल करून या निर्णयाला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात येतील, असं तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी म्हटलं आहे.


"डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र दिल्याबद्दल सहा महिन्यांपूर्वीच याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. त्यावेळी न्यायालयास जात पडताळणी समितीने दिलेल्या निकालाची प्रत देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.


"दाखला जप्त करण्याचे आदेश"


जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांनी उच्च न्यायालयाच्या निकालांचे उदाहरण देऊन खासदार महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा दाखला अवैध ठरवला.


अक्कलकोट तहसीलदारांनी दिलेले मूळ बनावट जात प्रमाणपत्र जप्त करावे, हे प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित कर्मचारी आणि उमरगा तहसील कार्यालयातून बनावट फसल उतारा देण्यासाठी मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तहसीलदारांनी न्यायालयात फिर्याद द्यावी, असे आदेश जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सूळ, सचिव संतोष जाधव आणि सदस्य छाया गाडेकर यांनी दिले आहेत.


खासदार डॉ. महास्वामींची वाट बिकटच


याप्रकरणी सोलापुरातील स्थानिक पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे वार्ताहर एजाज हुसेन यांनी अधिक माहिती दिली. जातीचा दाखला अवैध ठरल्याने डॉ. महास्वामी यांची पुढची वाट बिकट असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे.



प्रतिमा मथळाडॉ. जयसिद्धेश्वर स्वामी


ते सांगतात, स्वामी यांनी मूळ प्रमाणपत्र कधीच सादर केलं नाही. समितीने ते वारंवार मागूनही ते सादर करण्यात आलं नाही. अखेर, वळसंग पोलीस ठाण्यात ते गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांनी हे जाणूनबुजून केलं आहे का, असा आरोप होऊ लागला आहे.


समितीने पडताळणी केल्यानंतर महास्वामी वगळता त्यांचे अन्य नातेवाईक हिंदू जंगम व हिंदू लिंगायत असल्याचं आढळलं. ही बाब विचारात घेत त्यांचं बेडा जंगम जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं आहे. परिणामी, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून आहे. तिथंही डॉ. महास्वामींच्या विरोधात निकाल गेल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या निर्णयाचा परिणाम त्यांच्या खासदारकीवर होऊ शकतो.


2014च्या निवडणुकीत काय झालं?


सोलापूर लोकसभा मतदारसंघ 2009 पासून अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 2009 मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे इथून निवडून गेले होते. पण 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिंदे यांना भाजपचे नवखे उमेदवार शरद बनसोडे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते.


भाजपमधील पक्षांतर्गत राजकारणातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं नाव पुढे आलं. त्यावरून वादही निर्माण झाला होता. पण अखेरीस डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी मिळवण्यात यश आलं. अशात वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर हेसुद्धा सोलापुरातून निवडणुकीच्या मैदानात उतरले.


त्यामुळे सोलापुरात काँग्रेसचे शिंदे, भाजपचे महास्वामी आणि वंचितचे आंबेडकर असा तिरंगी सामना पाहायला मिळाला. यात डॉ. महास्वामी यांनी बाजी मारली. महास्वामी यांना 5 लाख 15 हजार 798 तर शिंदे यांना 3 लाख 60 हजार 738 मते मिळाली. तिसऱ्या स्थानावरील आंबेडकर 1 लाख 58 हजार 887 मतांपर्यंत मजल मारू शकले.


...तर मी लोकसभा लढवणार - प्रा. लक्ष्मणराव ढोबळे


डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या खासदारकी जाणार किंवा नाही, याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. पण याबाबत प्रतिक्रिया येण्यास आता सुरुवात झाली आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्री राहिलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


भाजपचे सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे. यादरम्यान निवडणूक लागल्यास आणि पक्षाने आदेश दिल्यास भाजपतर्फे सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू, असं प्रा. ढोबळे यांनी म्हटलं आहे.