हा तर ब्राम्हणवादाचा अजेंडा

हा तर ब्राम्हणवादाचा अजेंडा


Published On :  Online  lokanchilokshahi


 


श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट भुज, गुजरातमधील प्रकाराने डोके भिरभिरायला लागले आहे. तेथील प्राचार्या बाईंच्या बुद्धीची किव येते. मुलींना जर मासिक पाळी असेल तर त्यांनी शाळेत येण्याची गरज नाही आणि कुणा-कुणाला मासिक पाळी आहे हे मुलींचे कपडे काढून बघणे कितपत योग्य आहे? हा प्रकार चिड आणणारा आहे. यावरून ब्राम्हणवादाची पाळेमुळे किती घट्ट रूजली आहेत, हे लक्षात येत असून हा तर ब्राम्हणवादाचा अजेंडाच आहे. त्यामुळे अशाप्रकारे घटना वाढीस लागत आहेत.


सक्षम आणि लायक असलेल्या महिलांना दुय्यम व गुलामीची वागणूक ब्राम्हणी व्यवस्थेने दिली. त्यामुळे महिला आज आपल्या सत्व विसरल्या आहेत. आपले कर्तृत्व विसरून गेल्या आहेत. त्यामुळे त्या स्वत:हून आम्ही दुय्यम असल्याचे कबूल करत आहेत. बरं एक महिला असलेल्या प्राध्यापिकेने मुलींच्या मासिक पाळीबद्दल विचारावे आणि अकलेचे तारे तोडावेत याला काहीच धरबंद राहिलेला नाही. मासिक पाळी महिलांच्या नव सृजनाचा अविष्कार आहे तिलाच विटाळ मानणे म्हणजे ब्राम्हणवादाची बौध्दीक दिवाळखोरी आहे.


 ब्राम्हणांचे संविधान असलेल्या मनुस्मृतीत महिलांना दुय्यम स्थान आहे. तर महिलांना शुद्रच मानण्यात आले आहे. त्यांनी केवळ सेवा करायची असा दंडकच आहे. आजही ब्राम्हणाच्या घरीही महिलांना शुद्र मानण्यात आले आहे. त्यांनाही कुठलेही स्थान नाही. ब्राम्हणांच्या पाखंडी धर्मग्रंथात महिलांवर गुलामी लादण्यात आल्याने त्या मूर्तीपुजक झाल्या. त्यांना स्वतंत्र विचार करता येत नाही. महिला आज सर्वोच्च स्थानावर पोहचूनही अशा प्रकारचा विचार करत असतील तर त्यांनी सावित्रीमाई फुले यांना समजून घेतले नाही. ब्राम्हणवादाच्याविरोधात सावित्रीमाई खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांना शिक्षणाचा पाया घालता आला. त्याला खंबीरपणे साथ होती ती राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांची. सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच आज महिला शिकल्या. परंतु सावित्रीमाईंना समजून न घेता त्या काल्पनिक वटसावित्री पुजू लागल्या. येथेच घात झाला. एक महिला शिकली तर सार्‍या कुटुंबात प्रकाश आणते. परंतु भुज घटनेत प्राचार्यसारख्या पदावरील महिलेने अशा प्रकारे मुलींची तपासणी करणे ब्राम्हणवाद मजबूत करण्याचेच काम आहे. महिलेला नेहमीच एक भोगवस्तू म्हणून पाहण्यात आले. तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा दुय्यमच राहिला. आज एखाद्या कार्यक्रमात जेव्हा एखाद्या महिलेला नवर्‍याच्या बाजूला उभी करण्यात येते तेव्हा तिला डाव्या बाजूलाच ठेवण्यात येते. म्हणजे महिला ही उजवी नसून डावी आहे. डावी म्हणजे कमी लेखण्यात येते. हे थोतांड ब्राम्हणी व्यवस्थेने लादले.


 


फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून ब्राम्हणांना भंडावून सोडले होते. सत्यशोधक कार्यकर्ते ब्राम्हणांच्या घरी जाऊन आम्हांला महिलेची डिलेव्हरी पाहायची आहे असे म्हणत. त्यामुळे ब्राम्हणांना पळता भुई थोडी झाली होती. खरंच ब्राम्हणाचा जन्म ब्रम्हदेवाच्या मुखातून होत आहे का? याची तपासणी करण्यासाठी असा फंडा आखण्यात आला होता. अखेर ब्राम्हणांनी माघार घेत आमचाही जन्म तुमच्यासारखाच होत असल्याचे सांगितले होते. परंतु भुजसारख्या थोतांडी कल्पना आजही समाजात जागोजागी दिसून येतात. या कल्पना कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. एवढेच कशाला मासिक पाळी दरम्यान महिलांनी मंदिरात प्रवेश न करणे हासुध्दा मनुस्मृतीने दंडक घातला आहे. मग तो शनीशिंगणापूर असो अथवा शबरीमाला मंदिर प्रवेश असो. येथेही मंदिरात प्रवेश करण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागला आहे. देव-धर्म व पोथी-पुराणे महिलांच्या माथी मारून त्यांना गंडवण्यात आले. त्यांना मानसिक गुलाम बनवून ब्राम्हणी व्यवस्थेने स्वत:ची पोळी भाजून घेतली. उपास-तापास करायला लावून त्यांना ऍनिमियाग्रस्त केले. आज भारतीय महिलांमध्ये रक्तक्षय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याला कारण उपास-तापास होय. उपाशीपोटी राहून रक्ताची निर्मिती होणार आहे का? याची साधी भनक महिलांना नाही.


 


मुलगी असल्यावर आई-वडीलंाच्या धाकात, लग्न झाल्यावर नवर्‍याच्या धाकात व म्हातारपणी मुलांच्या धाकात अशी गुलामी दृढ करण्यात आली. महिलेने स्वत:चे निर्णय घेता कामा नये. तिला व्यक्ती स्वतंत्रच नाही. म्हणून शाळा, महाविद्यालयातही अशाप्रकारच्या घटना वाढीस लागत आहेत. महिलांनी काल्पनिक वटसावित्री न वाचता खरीखुरी सावित्रीमाई समजून घेतली तरच त्यांचा उध्दार शक्य आहे. नाहीतर गुलामीचे हे चटके आणखी बसणार आहेत. कारण दिवसेंदिवस ब्राम्हणवादाची पाळेमुळे घट्ट होताना दिसत आहेत. म्हणूनच हिंगणघाटसारखा प्रकार होतो. सारे काही एकतर्फीच सुरू असते. महिलेलाही मन आहे, तिला विचार आहेत. याचा विचार न करता तिच्यावर अंधश्रध्दा लादून मनाचा कोंडमारा केला जातो. जाणीवपूर्वक तिला सोशिक बनवले जाते. त्यामुळे ती बंड करून उठत नाही. बंड करणे म्हणजे ब्राम्हणवादाला आव्हान देणे आहे. त्यासाठी महिलांनी आपला खराखुरा इतिहास वाचला पाहिजे. त्या इतिहासापासून धडा घेत क्रांतीची मशाल पेटवली पाहिजे. त्यासाठी हवी प्रखर इच्छाशक्ती व दृढ आत्मविश्‍वास. हा दृढ आत्मविश्‍वास केवळ मूलनिवासी महापुरूषांच्या विचारातूनच येऊ शकतो हे महिलांनी लक्षात घेतले पाहिजे.