राष्ट्रीय पक्षांना मालामाल करणारे अज्ञात स्त्रोत कोण?
Published On : 10 Mar 2020 By : online
१४ वर्षात ११ हजार २३४ कोटी रुपयांची देणगी, एडीआरचा दावा
नवी दिल्ली: देशातील राष्ट्रीय राजकीय पक्षांना आर्थिक वर्ष २००४-०५ ते २०१८-१९ दरम्यान अज्ञात स्त्रोतांकडून ११ हजार २३४ कोटी रुपयांची देणगी मिळाली. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) यांनी हा दावा केला आहे. राष्ट्रीय पक्षांना मालामाल करणारे अज्ञात स्त्रोत कोण? याबाबत मात्र एडीआरने खुलासा केलेला नाही.
एडीआरने सात राष्ट्रीय पक्ष भाजपा, कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (भाकप), राष्ट्रवादी कॉंग्रेस (राष्ट्रवादी), बहुजन समाज पार्टी (बीएसपी) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीचा वापर केला आहे.
अज्ञात स्त्रोत म्हणजे प्राप्तिकर रिटर्नमध्ये जाहीर केलेली रक्कम, ज्याला देणार्याचे नाव माहित नसते आणि देणगीची रक्कम २० हजारा पेक्षा कमी असते. अज्ञात स्त्रोतांमध्ये निवडणूक रोखे, कूपन विक्री, मदत निधी, विविध उत्पन्न, ऐच्छिक योगदान आणि संमेलनासाठी आणि आघाडीला दिलेल्या योगदानाची रक्कम समाविष्ट आहे. बीएसपीने जाहीर केले की त्यांनी कूपन विक्री, निवडणूक रोखे किंवा अज्ञात स्त्रोतांमधून ऐच्छिक योगदान (२० हजार किंवा त्याहून कमी रकमेचे उत्पन्न) मिळकत दाकवली नाही.
ही देणगी देणार्यांची नावे जाहीर केली गेली नाहीत. एडीआरने सांगितले की, २०१८-१९ मध्ये भाजपाला अज्ञात स्त्रोतांकडून १,६१२.०४ कोटी रुपये मिळाले आहेत. अज्ञात स्त्रोतांकडून राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण रकमेच्या (२,५१२.९८ कोटी) ६४ टक्के आहे. अन्य पाच राष्ट्रीय पक्षांपेक्षा अज्ञात स्त्रोतांकडून मिळालेला पैसा दीडपट अधिक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. एडीआरच्या मते, कॉंग्रेसला अज्ञात स्त्रोतांकडून ७२८.८८ कोटी रुपये मिळाले आहेत. प्राप्त झालेल्या एकूण रकमेपैकी हे २९ टक्के आहे. त्यानुसार २००४-०५ ते २०१८-१९ या वर्षांत कूपनच्या विक्रीतून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने ३,९०२.६३ कोटींची कमाई केली आहे.