मुलगी पळवून नेऊ म्हणणारे आज विधानसभेत- मुख्यमंत्री
मुंबई | तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं सांगणारे राजकारणी आहेत, ते निवडून येतात. ते इथे आहेत. सैनिकांच्या पत्नीबद्दल बोलणारे इथे आहेत. मतांच्या राजकारणासाठी एवढे आपण आगतिक आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षावर महिला सुरक्षेवरून निशाणा साधला.
महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे. याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत केलं.
येत्या महिला दिनाच्या निमित्तानं विधानपरिषदेत ‘महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण’ यासंदर्भातला ठराव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मांडला होता. या प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
दरम्यान, देशाचं रक्षण करायला महिला सज्ज आहेत. मात्र महिलांचं रक्षण करण्यासाठी कोणी आहे का? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.