कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांची साक्ष नोंदवणार
Published On : 18 Mar 2020 By :online lokanchi lokshahi
४ एप्रिल रोजी हजर राहण्याचा आयोगाचा आदेश
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आलं असून त्यांची साक्ष नोंदवणी जाणार आहे. कोरेगाव भीमा आयोगाकडून हे समन्स बजावण्यात आलं असून ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कारणं आयोगाकडून तपासली जात असून त्याच पार्श्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आलं आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश जे. एन. पटेल यांनी याआधी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार असल्याचं सांगितलं होतं. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
ऍड. प्रदीप गावडे यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानंतर आयोगाने शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला होता.
शरद पवार यांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावं घेतली होती. कोरेगाव भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिलेली आहे.
त्या काळात जे युद्द झालं. त्यावेळी पेशव्यांचा पराभव झाला होता. इथे दरवर्षी लोक येतात. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणार्या लोकांना पाण्याची व्यवस्था करतात. स्थानिक आणि बाहेरून येणार्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केलं, असं पवार म्हणाले होते. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीनं साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी ऍड. प्रदीप गावडे यांनी लावून धरली होती.