हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण का..  -





 

 





 















हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण का..




 -


 




महान क्रांतीकारक मार्टिन ल्युथर किंग भारतात आले तेव्हा, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या देशाला तीर्थक्षेत्र व भारताचे अहिंसा तत्व जगाचा प्रेरणास्रोत आहे असं म्हणाले. ही फार अभिमानाची बाब आहे. त्या तीर्थक्षेत्रावर आजकाल होणारा हिंदू आणि मुस्लिम ध्रुवीकरणाचा विचार, १९८९ नंतरच्या निवडणूकांपासून फक्त मतदानाच्या विभाजना पुरता ऐकायला वाचायला मिळायचा. तो आता दररोज चर्चेत आहे, याचे कारण, देशाच्या समाज जीवनावर सत्तेच्या राजकारणाने संपूर्ण प्रभाव टाकला आहे.


हिंदू आणि मुस्लिम असो अन्य कोणतेही धर्म, ते एकमेकांपासून दूर टोकाला जाणे हे केवळ अनिष्ट नाही तर देशाच्या शांती, सौहार्दावर आलेले अरिष्ट आहे.सर्व धर्म एकाच ठिकाणी, आपले अस्तित्व जपूनही एकत्रच रहायला हवेत. हीच परंपरा आहे. कांही दिवसांपासून व्हाट्स अप वर एक व्हिडिओ येत आहे. एका उंच टेकडीवरच्या फळीवर मध्यभागी पती, एका टोकाला आई, दुसऱ्या टोकाला पत्नी… पती त्या दोघींपैकी एकीच्या दिशेने निघाला किंवा त्यांच्यापैकि एकजण त्याचेकडे निघाले, तरी फळी कलंडणार असते. शेवटी दोघी दोन्ही टोके सोडून हळूहळू त्याच्या जवळ येतात. सगळ्यांचा धोका टळतो.


आजच्या परिस्थितीत हे चित्र फारच तंतोतंत लागू पडते. त्या दोघी म्हणजे विविध जात, धर्माचे प्रतिक आहेत. मध्यभागी आहे या देशाची शाश्वत गरज असलेली लोकशाही व्यवस्था.धर्म, जात, विचारांचे एकमेकांपासून दुरावणे हे ध्रुवीकरण कुणाच्याही हिताचे नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा जी फाळणी झाली, तीच आता ध्रुवीकरण हे नांव घेऊन थैमान घालते आहे. देशातील दैनंदिन समाज जीवन हे सर्व जाती धर्माच्या, सर्व व्यक्तींच्या सहजीवनाचे आणि श्रमविभागणीचा गौरव आहे. मराठी पाठ्यपुस्तकात “देश म्हणजे देशातील माणसे” हा न्याय, समतेचा, संदेश देणारा धडा होता. त्या माणसांच्या जगण्यावरच संदेह निर्माण होईल, असे विभाजन म्हणजे हे धार्मिक ध्रुवीकरण.


एकीकडे निसर्गाची अवकृपा असताना रानावनात राबणारे कष्टकरी, शेतकरी, त्यांच्या घामाचे दाम मिळत नाहीत म्हणून, हवालदिल आहेत. जगातील सर्वाधिक तरुणाई म्हणून मिरवणाऱ्या देशातील तरुणांचे भवितव्य अंधारलेले आहे. दुसरीकडे आपलाच झेंडा केंद्रस्थानी असावा, हा अजेंडा घेऊन सामान्यांच्या जीवनाची आहूती द्यायचा विचार म्हणजे हे ध्रुवीकरण. ते हानीकारकच आहे.


देशातील उच्च शिक्षित गुणवंतांना देशांतर्गत संधी मिळाली नाही तर ते परदेशी जातात. संयुक्त राष्ट्र संघाच्या माहिती नुसार, भारतातून दररोज किमान १५० नागरिक परदेशी नागरिकत्व स्विकारतात. जगभरात जवळपास दोन कोटी अनिवासी भारतीय आहे. ते केवळ पैसा, श्रीमंती, वैभवाच्या हव्यासाने देश सोडून गेलेले नाहीत. तर परदेशात आपल्या देशाचा गौरव उंचावत, भारतीय असल्याचा अभिमान घेऊन गेले आहेत. ते देशाबाहेर गेली तरी अनेकांचा जीव इथेच गुंतलेला आहे. त्यांनी मागे वळून पाहिले, विभाजनाने चिरफाळ्या झालेला देश पाहून काय वाटेल?
कष्टकरी व गुणवंतांच्या श्रमाला असे काळोखात ढकलण्याचे विचार म्हणजे हिंदू-मुस्लिमांचे धार्मिक ध्रुवीकरण असेल. मुस्लिमांना देशाच्या सर्व प्रक्रियेतून बाद ठरवायचे, म्हणजे अश्फाक उल्ला, परमवीर अब्दुल हमीद, डॉ.अब्दुल कलाम, उस्ताद झाकीर हुसैन, मोहम्मद रफी, बिस्मिल्ला खान, अशा लाखोंच्या कर्तृत्वाची प्रतारणा होईल.


१९८३ च्या विश्वचषकात कपिल देव सोबत सय्यद मुस्तफा हुसैन किरमाणी आणि रॉजर बिन्नी यांनी झुंझार खेळ केला.धार्मिक ध्रुवीकरण झाले तर ती झुंज कोणत्या धर्माच्या खात्यात जमा करायची?


गावखेड्यातील शेतकरी ऊसाचा खोडवा राखण्यासाठी पाचट पेटवून द्यायच्या आधी, एक दिवस बांधावर गोवऱ्यांचा धूर करून, मधमाश्यांना जीव वाचवून उडून जाता यावे, बांधावरील फळा-फुलांची झाडे, जनावरांच्या चाऱ्याचा वणव्याची झळ बसू नये म्हणून,ऊसाचे पाचट बांधापासून कासराभर आंत ओढून घेतो. ऐनवेळी आग भडकली तर पाण्याचे हौद भरून ठेवतो. अशी जीव वाचवायची धडपड, विनाशाचे निमित्त घडू नये हा अशिक्षिताचा विवेक… ध्रुवीकरणाची महती गाणारांना कळत नाही का?


​समाजाच्या एकतेत देशाची एकात्मता सामावली आहे. चीन विरूध्दच्या युध्दात नामुष्की ओढवलेल्या देशाला स्व. लाल बहादूर शास्त्री यांनी, जय जवान जय किसान ही एक साद घातली. देशाच्या पंतप्रधानास एक वेळ उपवास करावा लागला, हे अशिक्षित शेतकऱ्यांना जिव्हारी लागले. त्यांनी हरितक्रांती घडवून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. तर तुटपुंज्या सामग्री, पण , अत्युच्च मनोधैर्या असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानला धडा शिकविला.


स्व. लाल बहादूर शास्त्री, ते शेतकरी, परमवीर अब्दुल हमीद सह अनेक शूरवीरांची, हिंदू-मुसलमान अशी विभागणी, त्यांच्या देशप्रेम, शौर्य, कर्तव्यनिष्ठेवर अन्याय करणारी आहे.
विसावे शतक संपताना आलेले धर्मांध सावट आणि एकविसावे शतक देशाला धार्मिक दुहीच्या काठावर घेऊन आले आहे. शेकडो वर्षे गुलामगिरी, पारतंत्र्याचे घाव सोसून, लाखो देशभक्तांच्या आहूती नंतर मिळालेले स्वातंत्र्य, हे अशा धार्मिक विभाजनाच्या हट्टापायी पणाला लागणार नाही का? सनई, चौघड्यांचे मंगलगान, की डंके की चोट पे दंगलगान हे ठरवायची वेळ आली आहे.देशातील गरीब, महिला, कष्टकरी, जनता ही मुंगी आणि मधमाशांचे सामर्थ्य घेऊन राबते आहे.


मानवतेचा संदेश देणारा इस्लाम आणि हिमालया इतके उत्तुंग, महासागरा इतके विशाल आणि अथांग असणे.निसर्ग आणि नियतीशी नाते सांगणाऱ्या आपल्या धर्म ग्रंथातील विचार, संतांच्या शिकवणीचा अभिमान असणे. ज्ञान, भक्ती, वैराग्य, प्रेम, अहिंसा यांचा अंगिकार करणाऱ्या संस्कारांचे जतन करणे. आभाळाचा रंग बदलणाऱ्या सागराचे सामर्थ्य, ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी मागितले ते पसायदान म्हणजे हिंदू धर्म…. त्या मानवतेचा संदेश देणाऱ्या हिंदू-मुस्लिम धर्माचे ध्रुवीकरण, हा उपाय विनाशकारी आहे.


पहिल्या महायुद्धापासून अमेरिका आणि युरोपीय देशांच्या योजना, जगाचे धार्मिक आधारावर विभाजन करण्याच्या आहेत. मध्यपूर्व आशिया खंडातील इस्लाम धर्मीयांत वाद लावून पश्चात्यांनी त्यांना आधीच अंकित केले आहे. आता हिंदू आणि बौध्द राष्ट्रांचे सौख्य हिरावून घेण्याच्या परकीय डावपेचांना, भारतात धार्मिक ध्रुवीकरण हे पश्चात्या राष्ट्रांना वरदान ठरेल. म्हणून चला! हिंदू-मुस्लिम, आपला-परका या भावना सोडून देऊ. माझ्या मातृभूमीचे गौरवगीत जन-गण-मन गाताना डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याचा डौल टिकवायचा हा एकच सर्वांचा धर्म आहे.


इन्सान का इन्सान से हो भाईचारा यहीं पैगाम हमारा….जय भारत......जय संविधान