गटार साफसफाई करताना तीन वर्षांत २७१ सफाई कामगारांचा मृत्यू

गटार साफसफाई करताना तीन वर्षांत २७१ सफाई कामगारांचा मृत्यू


Published On :    8 Mar 2020  By : online lokanchi lokshahi  लोकांचि लोकशाही


 


राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा अहवाल, कामगारांची सुरक्षा वार्‍यावर



नवी दिल्ली:  सफाई कामगारांची सुरक्षा केली जात आहे असा ढोल बडवला जात असला तरी हा दावा फसला असून गेल्या तीन वर्षांत गटारे साफ करताना एकूण २७१ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ११० लोकांचा मृत्यू २०१९ मध्ये झाला आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने ही माहिती दिली.


आयोगाचे अध्यक्ष मनहर वालजीभाई जाला म्हणाले, की बहुतेक ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्री नसल्यामुळे व कंत्राटी व्यवस्थेमुळे सफाई कामगार मरतात. २०१८ मध्ये ६८ आणि २०१७ मध्ये १९३ जणांचा मृत्यू झाला. राज्य पातळीवर सफाई कामगारांच्या मृतांच्या संख्येविषयी बोलताना उत्तर प्रदेशात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक ५० मृत्यू आहेत. तर तामिळनाडू, हरियाणा आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी ३१ आणि महाराष्ट्रात २८ जणांचा मृत्यू झाला.


गटारे साफ करणार्‍या सफाई कामगारांच्या मृत्यूबद्दल विचारले असता आयोगाचे अध्यक्ष जाला म्हणाले, या मृत्यूंचे मुख्य कारण म्हणजे यांत्रिकी वापरासाठी सोयी नसणे आणि बर्‍याच राज्यांत सफाई कामगारांना कंत्राटी पद्धतीने ठेवले आहे. कुठलही सरकार सफाई कामगारांच्या हिताची योग्य काळजी घेत नाहीत. आम्ही वारंवार विनंती केल्याने दिल्ली आणि हरियाणासारख्या काही राज्यांनी गटार साफ करण्यासाठी मशीन वापरण्यास सुरुवात केली आहे. सर्व राज्यांना असा प्रयत्न करावा लागेल.


दुसरीकडे सफाई कामगारांच्या कल्याणासाठी काम करणार्‍या संघटनांचे म्हणणे आहे, की मृत्यूची आकडेवारी यापेक्षा खूपच जास्त आहे. कारण दुर्गम भागांतील बरीच प्रकरणे नोंदवली जात नाहीत. ‘सफाई कर्मचारी आंदोलन’ चे प्रमुख आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते बेजवाडा विल्सन म्हणाले, की ही मृत्यूची आकडेवारी चुकीची आहे. संख्या यापेक्षा खूप जास्त आहे. विशेष म्हणजे मार्च २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गटार साफसफाई करताना मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्यात यावी. असा आदेश असूनही लोकांना मदत मिळत नाही. त्यासाठी खूपच अडचण होत आहे. कारण सरकारच्या प्राथमिकतेत सफाई कामगार दिसत नाहीत.