चाटू मीडियाचा उच्छाद
Published On : 2 Apr 2020 By : online
भारतातील ब्राम्हण-बनिया मीडियाने कुठलीही शहानिशा न करता एकतर्फी बातम्या देणे सुरू केले. काही मीडियाने कहर करत ‘कोरोना जिहाद’ असा शब्दप्रयोग करत आपली बौध्दीक दिवाळखोरी जाहीर केली. सर्वच न्यूज चॅनेल व वृत्तपत्रे यात आघाडीवर होते. म्हणजेच या विषयाला धार्मिक रंग देऊन दंगली कशा घडतील यासाठी चाटू मीडियाने अक्षरश: उच्छाद मांडला.
दिल्लीतील निजामुद्दीन तबलीगी जमातच्या मकरजमध्ये मुस्लीम बांधवांसाठी कार्यक्रम घेण्यात आला होता. तेेथे देश-विदेशातील मुस्लीम बांधव येतात. आताच हा कार्यक्रम होत नसून तेथे परंपरागत कार्यक्रम होत असतो. परंतु या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसचे रूग्ण वाढले आणि त्याचे खापर मुस्लिमांवर फोडणे हे म्हणजे अतीच झाले.
ज्यावेळी हा कार्यक्रम सुरू होता त्याचवेळी अचानक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करत जेथे आहात तेथेच थांबा असे सांगितले होते. त्यामुळे त्या कार्यक्रमाला जमलेल्या लोकांना बाहेर पडता आले नाही. म्हणजे ते एकप्रकारे अडकले होते. लपून बसले नव्हते. परंतु भारतातील ब्राम्हण-बनिया मीडियाने कुठलीही शहानिशा न करता एकतर्फी बातम्या देणे सुरू केले. काही मीडियाने कहर करत ‘कोरोना जिहाद’ असा शब्दप्रयोग करत आपली बौध्दीक दिवाळखोरी जाहीर केली. सर्वच न्यूज चॅनेल व वृत्तपत्रे यात आघाडीवर होते. म्हणजेच या विषयाला धार्मिक रंग देऊन दंगली कशा घडतील यासाठी चाटू मीडियाने अक्षरश: उच्छाद मांडला.
येथील मीडिया असे का वागते? मीडियाची मानसिकता एकांगी कशी? याचा विचार करावा लागेल. त्याच्या मुळाशी जावे लागेल. तरच काही हाती लागू शकते. मीडियाचे चार प्रकार आहेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ट्रॅडिशनल, व्होकल मीडिया. मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. त्यामुळे बातम्या प्रसारित करताना या अतिरंजित नसाव्यात. त्या एकांगी नसाव्यात. आपल्या एका प्रसारणामुळे देशात जातीय तेढ निर्माण होते का? याचे भान असले पाहिजे. परंतु येथील मीडिया हे काही पाहत नाही. त्याला कारण मीडियावर ब्राम्हण-बनियांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांना हव्या तशा बातम्या चालवल्या जातात.
मीडिया हे जनमत तयार करण्याचे काम करते. सारखे-सारखे हॅमरिंग करून कोरोना व्हायरस पसरवण्यास मुस्लीम दोषी आहेत असा मीडियाने ढोल बडवला तर लोकांची मानसिकताही मुस्लिमांविरोधी बनते. मग लोक मुस्लिमांना शिव्याशाप द्यायला तयार होतात. तोच रोल तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला टार्गेट करून मीडियाने निभावला. सारे जग कोरोनाग्रस्त झाले आहे. चीनच्या या जैविक अस्त्राने जगाला वेठीस धरले असताना येथील मीडियाने मात्र मुस्लिमांवर खापर फोडत पादर्याची भूमिका निभावली. पादरा कसा पादून बाजूला होतो तसाच येथील मीडिया ज्वलंत मुद्यांना बगल देत फुसकुली सोडून बाजूला होते. तशीच फुसकुली वारंवार सोडली जाते. परंतु मीडिया खोटा आहे याचा प्रत्यय लोकांना येत असल्याने लोक खुलेआमपणे मीडियाला शिव्यांची लाखोली वाहताना दिसत आहेत. तरीही ही मीडिया नावाची अनौरस अवलाद सुधारत नाही.
तबलीगी जमातनेही याविषयीची आपली बाजू मांडली. प्रधानमंत्र्यांनी २२ मार्चचा जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर संघटनेने आपला कार्यक्रम ताबडतोब थांबवला, पण देशभरातली रेल्वेसेवा बंद झाल्याने या कार्यक्रमासाठी आलेले अनेकजण अडकून पडल्याचं जमातने म्हटलं आहे. पत्रकार राणा अयूब यांनीही याविषयी ट्विटही केलं आहे. तर रिजॉय नावाच्या एका युजरने भाजपचा आयटी सेल या धार्मिक तेढीच्या गोष्टी पसरवत असल्याचे ट्विट केले आहे.
तबलीगी जमातच्या कार्यक्रमात अडकले होते त्यांना कोरोना जिहाद व लपलेले संबोधायचे आणि जे खुलेआमपणे मंदिरात कार्यक्रम घेत होते त्यांना अडकले होते असे मानायचे. म्हणजे आपल्या सोयीची बाजू मांडून मीडिया नामानिराळी राहू पाहते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळ-जवळ दीड लाख लोकांना विदेशातून विमानातून आणण्यात आले. त्यामध्ये कुठल्या जातीची किती लोकं होती याची आकडेवारी मीडियाकडे आहे का? त्यामध्ये निश्चितच स्वत:ला उच्चवर्णीय व उच्चभ्रू समजणारे लोक मोठ्या प्रमाणात असतील. परंतु याची वाच्यता मीडिया करणार नाही. ‘आपला तो बाब्या दुसर्याचं ते कार्ट’ अशी दुटप्पी भूमिका मीडिया निभावताना दिसते. सारे जग कोरोनावर लस कशी उपलब्ध होईल त्यावर संशोधन करण्यात गुंतले असताना भारतीय मीडिया मात्र या विषयाला धार्मिक रंग देण्यात गुंतली आहे. त्यामुळे हा मीडिया केवळ भाटगिरी करणारा आहे. लोकांनी अशा मीडियावर बहिष्कार घालायला हवा.
हा मीडिया समजून घ्यायचा असेल तर दि. १८ जानेवारी १९४३ रोजी विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाष्य आजही तंतोतंत लागू होत आहे. बाबासाहेबांनी रानडे गांधी आणि जिन्ना या सुप्रसिध्द भाषणात भारतातील पत्रकारितेविषयी केलेले भाष्य लक्षात घेतले पाहिजे. एकेकाळी पत्रकारिता हा एक प्रतिष्ठित पेशा होता. परंतु आता तो व्यापार झाला आहे.
एखाद्याने विकण्यासाठी साबण बनवावा यापेक्षा अधिक नैतिक कार्य या पत्रकारितेत उरले नाही. ती आता जनतेच्या जबाबदार मार्गदर्शकाची भूमिका निभावत नाही. बातमी देताना ती अतिरंजित नसावी, त्यामागे दुष्ट हेतू नसावा याचे भान ती बाळगत नाही. सरकारने आखलेले धोरण जनतेच्या आणि समुदायाच्या हिताचे नसेल तर मग ते कितीही उच्च पदावरील व्यक्तीने ठरविलेले असेल याची तमा न बाळगता त्यावर न घाबरता तुटून पडले पाहिजे. योग्य धोरण कोणते असावे यासाठी निर्भिडपणे मत व्यक्त केले पाहिजे. हे आपले प्रथम आवश्यक कर्तव्य आहे असे येथील पत्रकारिता मानत नाही.
एखाद्याला नायकत्व बहाल करणे आणि त्याचे पूजन करणे हेच आपले परमकर्तव्य असल्याचे भारतीय पत्रकारितेने ठरवले आहे. सनसनाटी निर्माण करणार्या कुहेतूने बेजबाबदार वृत्त देणे, सहेतूक स्वार्थ ठेवून लोकांच्या भावनेशी खेळणार्या तर्कहीन अफवा पसरविणे यात भारतीय पत्रकारिता रममाण झाली आहे. भारतीय पत्रकारिता म्हणजे वाजंत्र्यांनी आपल्या नायकाचा गाजावाजा करण्यासाठी ढोल बडविणे होय. भारतीय पत्रकारितेने नायकपूजेसाठी इतक्या मूर्खतम पातळीवर जाऊन देशाच्या हिताशी यापूर्वी कधीच सौदा केलेला नव्हता. आजचा भारत नायक पूजेच्या कैफाने आंधळा झाला आहे व त्यास भारतीय पत्रकारिता जबाबदार आहे.
आज भारतीय मीडिया तर्कहीन अफवा पसरवण्यात गुंग झाली आहे. कुठला विषय धार्मिकतेशी जोडायचा याचे तारतम्य नसल्याने आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील मीडियाने जी धार्मिक व जातीय तेढीची भूमिका निभावली त्यामुळे जगभरात छी थू होत आहे. परंतु नायकपूजेने आंधळ्या झालेल्या या मीडियाकडून फारशी अपेक्षा करणेच गैर असल्याचे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दिलीप बाईत
twitter: @dilipharibait