८ मार्च महिला दिन कोणत्या महिलांचा?
Published On : 6 Mar 2021भारत हा कृषीप्रधान देश आहे. तुम्हाला दिल्लीच्या सीमेवर शंभर दिवस शेतकरी आंदोलन करतो.केंद्र सरकार किती गांभिर्याने दखल घेत आहे हे माहिती असेलच. भारतात महिलांचे प्रमाण पुरुषाबरोबर ८५-९० टक्क्यांपर्यंत आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. तुम्हाला दिल्लीच्या सीमेवर शंभर दिवस शेतकरी आंदोलन करतो.केंद्र सरकार किती गांभिर्याने दखल घेत आहे हे माहिती असेलच. भारतात महिलांचे प्रमाण पुरुषाबरोबर ८५-९० टक्क्यांपर्यंत आहे. महिला वर्ग हा सर्वात अज्ञानी, असुशिक्षित, असंघटीत आहे. मुठभर महिला सुशिक्षित आहेत, त्या दरवर्षी महिलादिन आठ मार्चला साजरा करतात. पण ९० टक्के महिलांना आठ मार्च महिला दिन का साजरा करतात, ते सांगता येत नाही. जगातील महिला एकत्र येऊन त्यांनी मोठा संघर्ष केला म्हणून आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो असे म्हणतात. पण त्या कोण महिला होत्या त्यांनी कोणाबरोबर संघर्ष केला? जातीव्यवस्थेविरोधात त्या लढल्या काय? शिक्षण घेण्याकरिता लढल्या काय? त्याकाळी त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता काय?
मग त्यांनी डायरेक्ट मताचा अधिकार कसा काय मागितला? भारतात तो जगाचा जागतिक महिला दिन का पाळला जातो. भारतातील महिलांच्या आणि जगातील त्या महिलांच्या समस्या समान होत्या काय? या देशात सातच्या आत महिला घरात पाहिजे. शिक्षणात, संपत्तीत, मालमत्तेत, आर्थिकदृष्ट्या तिला आजही किती अधिकार आहेत. आज भारतात महिलांचे-मुलींचे शोषण त्यांची देखरेख करणारेच करतात. जातीव्यवस्था व राजकीय नेते महिला खुलेआम शोषण करतात. त्याविरोधात विशिष्ट पक्षाच्या महिला राजकीय लाभासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, तेव्हा सर्व महिला समान का नसतात? याबाबत कोणत्या महिला नेत्यांनी ऐतिहासिक कार्य केले हे महिला दिनानिमित्त महिलांना जाहीरपणे सांगितले पाहिजे. भारतातील कोणत्या राज्यात कोणी किती ऐतिहासिक कार्य केले, हे भारतातील बहुसंख्य असंघटीत महिलांना आठ मार्च महिला दिन कशाचा समजले पाहिजे.
भारतात महिला दिनाची सुरुवात मुंबई येथे ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिन साजरा करून झाली. त्यानंतर ८ मार्च १९७१ ला पुण्यातील काही संघटनांनी मोर्चा काढला. त्यानंतर १९७५ ला युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, रेल्वे सरकारी, निमसरकारी कार्यालये तसेच काही राजकीय घरा मधूनही ८ मार्च महिला दिन साजरा व्हायला लागला.
भारतात ज्या महिलेने पहिले स्वत: शिक्षण घेऊन मुलींना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा काढली. ती १ मे १८४७ रोजी, सावित्रीबाई फुले (जन्म ३ जानेवारी १८३१,जन्म स्थळ-नायगाव,सातारा- मृत्यू- १० मार्च १८९७ पुणे येथे झाला.) त्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षण प्रसारक, समाज सुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन केली. तो खरा महिला दिन किंवा महिला शिक्षण दिन असायला पाहिजे होता.पण.....संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळ जवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मताधिकार नाकारलेला होता, हे सांगितले जाते पण त्यांना शिक्षणाचा अधिकार होता काय हे सांगितले जात नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण देण्यात येते.
या अन्याया विरुद्ध स्त्रिया (कोणत्या) आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मताधिकारासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन स्थापन झाली. परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थालांतरीत पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरीत मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मताधिकार मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळ्या वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मताधिकारासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे, अशी घोषणा केली.
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मताधिकार मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा ‘जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो प्रसार झाला.
यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मताधिकाराच्या मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. तो महिला दिन डावे समाजवादी पुरोगामी भारतात साजरा करतात. त्यांना भारतातील १८३१ ला जन्मलेली आणि १८४७ ला मुलींकरिता म्हणजे महिलांकरिता पहिली शाळा काढलेली सावित्रीबाई फुलेंचे कार्य आणि कर्तृत्व दिसत नाही. ज्या महिला आणि शिक्षणसंस्था सरस्वती शिक्षणाची देवी मानतात त्याच महिला आठ मार्च महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्याच बरोबर ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मताधिकार मिळावा अशा मागणीने अमेरिका न्यूयार्कला हलविण्यास सांगितले जाते. तेच काम भारतातील मुंबईच्या असंघटीत गिरणी कामगाराना संघटीत करण्याचे काम महात्मा ज्योतीराव फुले यांचे शिष्य रावबहादूर नारायण मेघंजी लोखंडे यांनी १८६० ते १८९० पर्यंत केले. त्याची नोंद मात्र डावे समाजवादी पुरोगामी घेत नाही.
रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी सप्टेंबर १८८४ मध्ये मुंबई येथे पहिली मोठी कामगार परिषद भरवून कारखाना आयोगाकडे ५,५०० कामगारांचे लेखी निवेदन पाठविले. त्यात दर रविवारी पगारी सुटी, दररोज नियमित कामाच्या १४ तासांऐवजी १२ तास, मुलांचे नोकरीचे वय ७ वर्षांवरून ९ वर्षे करावे, दर महिन्याच्या १५ तारखेच्या आत वेतन मिळावे, कामगाराला दुखापत झाल्यास पगारी रजा मिळावी, तसेच फार मोठी शारीरिक इजा होऊन कामगार कामासाठी अपात्र ठरल्यास त्याच्या भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद केली जावी या मागण्यांचा समावेश करण्यात आला होता.
या मागण्यांचे निवेदन कलकत्त्यास गव्हर्नर जनरलकडेही पाठविण्यात आले होते (१८८९) लोखंडे यांनी १८९० मध्ये ‘मुंबई गिरणी कामगार संघ’ (बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन) नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापिली. एप्रिल १८९० मध्ये दहा हजार स्त्री-पुरुष कामगारांची मोठी परिषद रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत भरविली. या परिषदेत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मुंबईतील औद्योगिक संघटनांच्या चळवळीतील ही महत्त्वाची घटना समजली जाते. त्यानंतर लगेचच १० जून, १८९० रोजी शासनाने, कामगारांना दर रविवारी पगारी सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला. १८९० मध्ये कामगार कायदा संमत करण्यात येऊन लोखंडे यांच्या काही सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला. सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. हा इतिहास महिला दिन साजरा करणारे का विसरतात? फुले, लोखंडे यांच्या कार्यापेक्षा जात महत्वाची वाटते म्हणून का?
भारतातील स्त्रीमुक्ती चळवळीच्या महिला नेत्यांना आणि त्याच्या आदर्श नेत्यांना भारतातील सावित्रीबाई ज्योतीराव फुले डोळ्यासमोर ठेऊन महिला दिन साजरा करावा असे का वाटत नाही? कारण काल त्या होत्या म्हणून तुम्ही आज सन्मानाने याठिकाणी आहात. भारतातील सावित्रीबाई फुले कुठे कमी पडतात, ते भारतातील महिला दिनाचे गोडवे गाणार्या महिला पत्रकार, थोर विचारवंत, महिला साहित्यिक, लढाऊ महिला नेत्या आणि सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणार्या महिलांनी जाहीरपणे सांगावे.