प्रधानमंत्री आवास योजनेत १४ हजार कोटींचा घोटाळा

 

प्रधानमंत्री आवास योजनेत १४ हजार कोटींचा घोटाळा





सीबीआयकडून पर्दापाश



नवी दिल्ली:  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत १४ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. सीबीआयने हा घोटाळा उघडकीस आणला आहे.

डीएचएफएल या कंपनीचे मालक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी हा घोटाळा केला आहे. दोघांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपल्या गुंतवणूकदारांकडून ८८ हजार ६५१ खाती उघडली. त्यांच्या माध्यमातून ५३९ कोटींचे अनुदान आणि व्याज मिळाल्याचे सांगितले. तसेच गुंतवणूकदारांकडून १ हजार ३४७ कोटी अनुदान येणे बाकी असल्याचे सांगितले. पण जेव्हा कंपनीचे ऑडिट करण्यात आले तेव्हा वाधवान बंधूंनी एकूण अडीच लाख खोटी खाती बनवली होती. या खात्यातून वाधवान बंधूंनी आवास योजनेचे पैसे लाटले होते.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या शाखेत २००७ ते २०१९ दरम्यान खाती उघडण्यात आली होती. त्यातून १४ हजार ४६ कोटींचे गृहकर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ११ हजार ७५५ कोटी रूपये कर्ज हे खोट्या कंपनीतून घेतले होते. या घोटाळ्यात वाधवान बंधूंनी इतर घोटाळ्यातून जमा केलेली रक्कम वापरली.

सीबीआयने गेल्यावर्षी जून महिन्यात येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी वाधवान बंधूंविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.  या आरोपपत्रात येस बँकेचे सस्थापक राणा कपूर यांनाही सहआरोपी करण्यात आले होते. कपूर कुटुंबाने डीएचएफएलमध्ये ३ हजार ७०० कोटी रूपये गुंतवण्याच्या बदल्यात ६०० कोटींची लाच घेतली होती. याच घोटाळ्याच्या आरोपाखाली सीबीआयने राणा कपूर आणि वाधवान बंधूंना अटक केली होती.